देशासमोर मोठे संकट उभे राहिले, की आपले सगळे लोक मतभेद, जातीभेद आणि पक्षीय भेदाभेद विसरुन एकत्र येतात आणि त्या संकटाचा मुकाबला मोठ्या धैर्याने तोंड देतात. पण मग सध्या देशात कोरोनाचे जे संकट आले आहे, त्या संकटाचा सामना करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, विनाकारण रस्त्यावर फिरु नका, गर्दी करू नका, अफवा पसरवू नका. मात्र काही जण स्वतःला अतिहुशार समजत असून रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. रस्त्याच्या कडेला दहा दहा जणांचे टोळके करून गप्पा मारत आहेत. कोरोना कोणाच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला करील, याचा काहीही नेम नाही. आपल्या चिल्यापिल्यांच्या आरोग्याचा, आपल्या समाजबांधवांच्या जीविताचा विचारही या लोकांच्या मनाला शिवत नाही. त्यामुळे या लोकांच्या असल्या अचाट शक्तीचा पोचाट प्रयोग करणाऱ्या या अतिउत्साही लोकांना एकच सांगावेसे वाटते, बाबांनो, विनाकारण गर्दी करता आहात. निदान नाही जनाची तर मनाची तरी खाडी फार लाज वाटू द्या.
१४० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात शंभरच्या आत टेस्टींग लॅब आहेत. बोटावर मोजण्याइतक्या दवाखान्यात उपचार उपलब्ध उपलब्ध आहेत. सध्या लागण झालेले लोक मोजकेच आहेत. म्हणून त्यांना योग्य प्रकारे खबरदारी घेत उपचार सुरू आहेत. हा आकडा वाढत गेला तर प्रशासन तरी काय करणार आहे? तेथे उपचार घेण्यास सांगितले जाईल, मेडीकलमधून गोळ्या-औषधे तुटवडा होईल आणि त्या मिळणार नाहीत किंवा शिल्लक राहणार नाहीत, स्थानिक डॉक्टर भितीपोटी उपचार करणार नाहीत, घरात मृत्यू झाले तरी कुणी बघायला येणार नाही. मृतदेह वाहून न्यायला वाहन मिळणार नाहीत, अंत्यविधी करणे अवघड होऊन जाईल, मोठमोठे खड्डे घेऊन जेसीबीने मृतदेह एकत्र पुरले जातील. त्याहीपेक्षा परिस्थिती हाताबाहेर गेली तर घराघरात मृतदेह कुजून सापळे बनतील. अर्थात हे कोणाला घाबरविण्यासाठी आम्ही लिहीत नाही. पण अशी भयानक परिस्थिती निर्माण होऊ द्यायची की नाही, हे सर्वस्वी आपल्या सर्वांच्या हातात आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्यांना परदेशात असतांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता लक्षणे जाणवून ते ॲडमीट होत आहेत. गेल्या १५ - २० दिवसांत ते किती लोकांच्या संपर्कात आलेले असतील, ते ज्यांच्या संपर्कात आलेत ते किती जणांच्या संपर्कात आले असतील. विचार करणे अवघड होत आहे. प्रशासन पोटतिडकीने बाहेर पडू नका, म्हणून सांगत आहे. तरी लोकांना काडीमात्र फरक पडत नाही. अजिबात लोक गंभीर होत नाहीत. रेल्वे खचाखच भरून वाहत आहेत. लग्न समारंभ धडाक्यात सुरू आहेत. १० टक्केदेखील लोक मास्क लावताना दिसत नाहीत. जीवनावश्यक नसलेल्या वस्तू बाजारात खुलेआम विकल्या जात आहेत, घेणारेही गर्दी करत आहेत. तुम्हाला घाबरुन देण्यासाठी आम्ही हे अजिबात लिहीत नाही. तर आपण वेळीच जागं होऊन प्रशासनाला सहकार्य करत काळजी घ्यावी, म्हणून आमचा हा शब्दप्रपंच आहे. प्रत्येकाने काळजी घेणे अत्यावश्यक आहे. इटलीसारखा तुरळक लोकसंख्या आणि प्रगत असलेला देश आज हतबल झालेला दिसत आहे. तर आपण कशात काय? जबाबदारी प्रशासनाची जितकी, त्यापेक्षा जास्त आपली आहे. गरज नसताना किंवा गरज असतानादेखील घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूलोकात पाऊल टाकल्यासारखे आहे. परत एकदा नमूद करतो आहोत, सदरचे लिखाण भिती घालण्यासाठी नसून वेळीच डोळे उघडण्यासाठी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासन खूप काळजी घेत आहे. आपणही आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडावी. शक्य तेवढ आयसोलेट होऊन रहा. अन्यथा भयानक परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. 'जो काळजी घेईल तो जगेल'
डॉक्टर, पोलीस आणि प्रशासन तुमच्यासाठी घर सोडून बाहेर आहे. मात्र तुम्ही तुमच्याचसाठी आणि स्वजनांसाठी घरात रहा. पुढील काही दिवस भयावह असतील. काळजी घ्या. तुम्हाला शासनाने सुट्टी दिली, त्याचा घरात आंनद घ्या आणि उद्या अर्थात दि. २२ रोजीच्या सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंतच्या जनता कर्फ्यूमध्ये मनापासून आणि शरिरानेदेखील घरातच रहा. धन्यवाद.